Assembly Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीचे ( Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, आता सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. अशातच सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी विविध भागात सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्क मैदानासाठी चार पक्षांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय अनेक भाषणांचा साक्षीदार हे शिवाजी पार्क आहे. अनेक नेत्यांची तडफदार भाषण या मंचावरुन झाली आहे. अशातच विधानसभा निवडणूकीसाठी देखील छत्रपती शिवाजी मैदासाठी 4 पक्षांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यात मैदान मिळवण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 17 नोव्हेंबरच्या प्रचारासाठी चारही पक्षांनी अर्ज केला आहे. 18 नोव्हेंबरला प्रचार थंडावतात, त्यामुळे 17 तारखेला या मैदानासाठी चढाओढ सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना, भाजप, शिवसेना शिंदेगट, आणि मनसेकडून या मैदानासाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अर्ज पहिल्यांदा मनसेकडून आला असल्याने मनसेच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून, विधानसभेच्या प्रचाराची सांगता एकाच वेळी होणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस हा 17 सप्टेंबर असून या दिवशी रविवार आहे. त्यामुळे सर्व नेत्यांचा मतदारांपर्यंत पोहचण्याचा शेवटचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. यामुळे शिवाजी पार्कवर सभा घेण्याचा प्रमुख पक्षांचा मानस आहे. अशातच आता शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी कोणाला मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.