IMD Weather Forecast : हवामान विभागाने पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी (20 ऑक्टोबर 2024) माहिती देताना, भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले क, 23 ऑक्टोबरपर्यंत पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. IMD ने एका विशेष बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, पुढील 24 तासांत अंदमान समुद्रावरील चक्रीवादळाचे परिवलन क्षेत्र सोमवारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे. ही हवामान प्रणाली 22 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून कमी दाब बनण्याची शक्यता आहे. तर 23 ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्री वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
IMD ने म्हटले आहे की, ‘नंतर ते वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि 24 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिमेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ओडिशाच्या किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे, तर दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहारमध्ये तापमानात घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये संध्याकाळी आणि सकाळी थंडीचा कडाका जाणवत आहे.
मुंबईत वादळाचा इशारा
हवामान खात्याच्या ताज्या बुलेटिननुसार, मुंबईत मंगळवारी (२२ ऑक्टोबर २०२४) सकाळी गडगडाटासह मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईच्या आसपासच्या भागात जोरदार वाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे. आयएमडीचे म्हणणे आहे की, पूर्व आणि पश्चिमेचे वारे एकमेकांवर आदळत आहेत, त्यामुळे या भागात पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे 24 ते 26 ऑक्टोबर 2024 या कालावधीत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि उत्तर किनारी आंध्र प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
तामिळनाडू-ओडिशामध्ये मुसळधार पाऊस
IMD नुसार, 21 ऑक्टोबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, येत्या काही दिवसांत 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.