Pune : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मंडई मेट्रो (Pune Metro) स्थानकात आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आटोक्यात आणली आहे. अपघात झाला त्यावेळी मेट्रो सेवा बंद होती त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही किंवा या अपघातात जीवित हानी झालेली नाही.
मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर एका फोम मटेरिअलला अचानक आग लागली त्यामुळे आजूबाजूला धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत होते. धुराचे लोट दिसल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
ही आग वेल्डिंग करताना लागल्याचा संशय आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी X वर पोस्ट करून मंडई मेट्रो स्टेशनला लागलेल्या आगीची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मंडई मेट्रो स्टेशनवर आगीची दुर्दैवी घटना घडली. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या पाच अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मेट्रो सेवा बंद झाल्यानंतर ही घटना घडली आहे. त्यामुळे मोठा धोका टळला आहे. या घटनेमुळे मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.’
यासंदर्भात पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी माहिती देताना सांगितले की, ‘तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असताना फोमच्या साहित्याने पेट घेतला होता. आग जास्त पसरली नसून सर्वत्र धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळाले.’
मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही !
मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.… pic.twitter.com/KxsEHOqQPo
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले होते. यानंतर मोठ्या प्रमाणात पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न सुटला. पुण्यातील मंडईतील मेट्रो स्टेशनचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या मेट्रो स्टेशनचे काम अजूनही सुरू आहे.