Iran-Israel War : इस्राईल आणि हमास (Israel-Hamas war) यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. युद्धादरम्यान गाझामध्ये मोठ्या प्रमाणात इस्राईली लष्कराची कारवाई सुरू आहे. दरम्यान, हमास प्रमुख याह्या सिनवार याच्या मृत्यूनंतर इस्रायली लष्कराने पुन्हा एकदा उत्तर गाझामध्ये प्राणघातक हल्ले केले आहेत. इस्राईलने केलेल्या या हल्ल्यामध्ये 87 लोक मारले गेले आहेत तर काही लोक अजूनही बेपत्ता आहेत. ही माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच या हल्ल्यात 40 जण जखमी असल्याची देखील माहिती आहे.
गाझाच्या उत्तरेकडील काठावर असलेले बीट लाहिया हे जवळपास एक वर्षापूर्वी इस्त्राईली ग्राउंड हल्ल्याचे पहिले लक्ष्य होते. इस्राईल गेल्या दोन आठवड्यांपासून उत्तर गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे. येथे हमासची अनेक ठिकाणे आहेत. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘या हल्ल्यात लोकांना सतत प्राण गमवावे लागत आहे. अशा परिस्थितीत उत्तरेकडील भागातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.’
इस्राईली सैन्याची कारवाई सुरूच
बीट लाहिया येथील हल्ल्यांवर इस्राईली लष्कराकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, असे म्हटले आहे की सैन्य “गाझामध्ये हवाई हल्ले आणि जमिनीवर कारवाई दोन्ही सुरूच ठेवत आहे.”
दरम्यान, इस्त्राईलने हिजबुल्लाला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात लेबनीज लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. लेबनीज लष्कराने ही माहिती दिली आहे. लेबनीज सैन्याने सांगितले की, ‘दक्षिणेकडील प्रदेशात त्यांच्या वाहनावर इस्राईलने केलेल्या हल्ल्यात त्यांचे तीन सैनिक ठार झाले आहेत. मात्र, या हल्ल्याबाबत इस्राईली लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.