Barack Obama : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत या शेवटच्या आठवड्यात डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणजे कमला हॅरिस (Kamala Harris) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) निवडणुकीच्या तयारीसाठी आपली पूर्ण ताकद लावत आहेत. निवडणूका आता तोंडावर आल्याने अनेक नेते मंडळी उघडपणे पाठिंबा दर्शवत आहेत. अशातच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी लास वेगासमध्ये कमला हॅरिस यांचे जोरदार समर्थन केले. आणि ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांचे कौतुक केले आहे. बराक ओबामा म्हणाले की, ‘अमेरिकन लोकांना देशाचे भविष्य घडवण्याची संधी आहे आणि नवीन पिढीचे नेते निवडून आणण्याची संधी आहे. अमेरिकेतील नागरिकांकडे चांगली, मजबूत, न्यायी आणि अधिक समान अमेरिका तयार करण्यात मोठी संधी आहे. ओबामा आपल्या रॅलीत म्हणाले, ‘अमेरिका पान उलटायला तयार आहे. आम्ही अध्यक्ष कमला हॅरिससाठी तयार आहोत. आनंदाची बातमी म्हणजे हॅरिस या पदासाठी पूर्णपणे तयार आहेत. असे ओबामा यांनी म्हंटले आहे.
दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवत ओबामा म्हणाले, ‘मी हे आधीही सांगितले आहे आणि मी पुन्हा सांगणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे 78 वर्षीय अब्जाधीश आहेत ज्यांनी नऊ वर्षांपूर्वी त्या सुवर्णपदावरून पायउतार केले होते. तेव्हापासून त्यांनी तक्रार करण्याचे थांबवले नाही. ते सतत तक्रार करत असतात. आणि जेव्हा ते तक्रार करत नाही तेव्हा ते तुम्हाला ट्रम्प बायबल विकण्याचा प्रयत्न करत असतात. अशी टीका ओबामा यांनी केली आहे.
ओबामा पुढे म्हणाले, ‘ट्रम्प त्यांना फक्त त्यांचा अहंकार, पैसा आणि त्यांच्या स्टेटसची काळजी आहे. ते तुमच्याबद्दल विचार करत नाहीत. ते शक्तीला आपले ध्येय साध्य करण्याचे साधन मानतात.’ देश खोलवर विभागलेला आहे हे अमेरिकन लोकांना पटवून देण्याची ट्रम्पची रणनीती आहे. असेही ओबामा यांनी म्हंटले आहे.