Cyclone Alert : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाचे बुधवारी सकाळी ‘दाना’ चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा 25 ऑक्टोबरच्या सकाळी पुरी किनारपट्टीवर धडकेल. या काळात ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
महाविद्यालये बंद
ओडिशामध्ये 14 जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालये 25 तारखेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. तर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ओडिशात सुमारे 10 लाख लोकांना स्थलांतरित केले जात आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिशाला जाणार होत्या. मात्र, दाना चक्रीवादळामुळे यांचा प्रस्तावित तीन दिवसांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
मासेमारीवर बंदी
भारतीय हवामान विभाग (IMD) ने इशारा दिला आहे की, चक्रीवादळ 24 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकू शकते. याच पार्श्वभूमीवर मासेमारीच्या कामांवर बंदी घालण्यात आली असून, मदतकार्यासाठी तटरक्षक दल पूर्णपणे सज्ज आहे.
मुसळधार पावसाला तोंड देण्यासाठी तयारी सुरू
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘राज्य प्रशासनाने सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासह कोलकाता महानगरपालिकेने अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे, ज्यामध्ये महापालिका आयुक्त धबल जैन यांनी आपत्कालीन योजनांवर चर्चा केली आहे.
दाना चक्रीवादळाचा 6 राज्यांवर प्रभाव
दाना चक्रीवादळाचा सर्वात जास्त परिणाम पश्चिम बंगाल, ओडिशा आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरी या राज्यांवर दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.