Israel Hezbollah War : इस्राईल (Israel) सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर लक्ष करत आहे. इस्राईली हवाई दलाने बेरूत आणि आसपासच्या ठिकाणांवर प्राणघातक हवाई हल्ले केले आहेत. इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात 12 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यांमध्ये लेबनॉनच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे. लेबनीजच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ‘इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात 12 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, 57 लोक जखमी झाले आहेत. तसेच दक्षिण बेरूतच्या बाहेरील रफिक हरिरी विद्यापीठ रुग्णालयासमोरील अनेक इमारतीही या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्राईली सैन्याने कोणतीही माहिती न देता हा हल्ला केला आणि त्यांनी हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हा हल्ला केला असल्याचे सांगितले आहे.
हिजबुल्लाहनेही प्रत्युत्तरात इस्राईवर अनेक रॉकेट डागले आहेत. मात्र, हिजबुल्लाहने केलेल्या या हल्ल्यांमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. इस्त्राईली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ‘इस्राईलवर डागण्यात आलेले सर्व रॉकेट हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केले आहेत.’
दरम्यान, इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा नाश करण्याचे आणि दहशतवादी गटाने कैद केलेल्या नागरिकांना मुक्त करण्याचे वचन दिले आहे. मात्र, कायमस्वरूपी युद्धविराम, गाझामधून इस्रायली सैन्याची पूर्ण माघार आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका या बदल्यातच इस्त्राईली नागरिकांची सुटका होईल, असे हमासचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राईलवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 250 जणांचे अपहरण करण्यात आले होते. तेव्हापासून इस्राईल हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे.