Bangladesh Protest : बांगलादेशात पुन्हा एकदा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी आंदोलकांनी अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांना हटवण्याची मागणी केली आहे. काल मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत.
मंगळवारी उशिरा रात्री आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. राजधानी ढाक्यातील राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेल्या बंगभवनबाहेरची परिस्थिती अशी बनली की लष्कराला नियंत्रण जबाबदारी हाती घ्यावे लागली.
यावेळी आंदोलकांनी अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. अध्यक्षांच्या राजीनाम्याची घोषणाबाजी करत आंदोलक पुढे सरकत होते. मात्र, पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना तिथेच रोखले. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना रोखले.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलक मागे हटले, मात्र या घटनेत बरेच आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या ढाका मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याची मागणी का?
नुकतेच अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी एक निवेदन सादर केले होते. शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या याच वक्तव्यानंतर बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या घटनात्मकतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी दिलेल्या वक्तव्यावर आंदोलक संतप्त झाले आहेत. त्यामुळे आंदोलक मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती, यावेळी लाखोंच्या संख्यने लोक रस्त्यावर उतरले होते. आणि शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. बांगलादेशात सुरू झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडावा लागला होता.