PM Modi In Maharashtra : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. महायुतीतील सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, महाविकास आघाडी कडून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये एकूण सहा मोठे पक्ष एकमेकांविरोधात लढत असल्याने मोठी चुरस असणार आहे. अशातच आता महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात सलग आठ दिवस सभा घेणार आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये या सभा पार पडणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान राज्यात सभांचा धडाका असणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा होणार आहेत. पंतप्रधान 14 नोव्हेंबरनंतर परदेश दौऱ्यावर असल्याने सभांना कमी कालावधी मिळणार आहे. त्यानुसार सभांचे काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मुंबईत किमान दोन सभा, पुण्यात एक सभा घेतील. तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांसाठी देखील पंतप्रधान सभा घेतील. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातही मोदींच्या सभा होऊ शकतात.
अद्याप भाजपकडून सभांचे ठिकाण निश्चित झालेले नाही. मात्र, वर दिलेल्या भागांमध्ये एकापेक्षा अनेक उमेदवारांसाठी एकत्रितपणे या सभा होऊ शकतात.