Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण ही एक ऐतिहासिक घटना आहे . दरवर्षी 26 ऑक्टोबर हा दिवस विलीनीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय इतिहासात या दिवसाला विशेष स्थान आहे. राजकारणी आणि इतिहासकारांच्या मते, या दिवसाने जम्मू-काश्मीरच्या लोकांना भारतीय नागरिक असल्याचा अभिमान दिला आहे.
26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले. या दिवशी जम्मू-काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांनी भारतात विलीनीकरणासाठी कायदेशीर कागदपत्रावर स्वाक्षरी केली. या दस्तऐवजाला ‘इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन’ असे म्हणतात. हा दिवस आजही जम्मू काश्मीर विलय दिवस म्हणून ओळखला जातो.
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची नजर काश्मीरवर होती. काश्मीर मुस्लीम बहुसंख्य आहे आणि त्यामुळे त्यावर पाकिस्तानचा अधिकार असायला हवा, असे जिनांचे मत होते. पण महाराजा हरिसिंह यांना हे नको होते. 22 ऑक्टोबर 1947 रोजी, काही जंगली टोळ्यांनी आणि पाकिस्तानी गुंडांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारत सरकार आणि महाराजा हरिसिंह यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. पाकिस्तानच्या नव्या सरकारने या टोळ्यांना शस्त्रे दिली होती.
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची नजर काश्मीरवर होती. काश्मीर मुस्लीम बहुसंख्य आहे आणि त्यामुळे त्यावर पाकिस्तानचा अधिकार असायला हवा, असे जिनांचे मत होते.
25 ऑक्टोबर 1947 रोजी महाराजा हरिसिंह श्रीनगरहून जम्मूला आले आणि 26 ऑक्टोबर 1947 रोजी हरिसिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. तसेच त्यांनी जंगली टोळ्यांशी सामना करण्यासाठी त्यांनी भारत सरकारकडून लष्करी मदत मागितली. जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाल्यामुळे, भारतीय सैन्याने सत्ता हाती घेतली आणि नोव्हेंबरपर्यंत बारामुल्ला आणि उरी ताब्यात घेतले. सरदार पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांनी जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती
26 ऑक्टोबर 1947 रोजी या विलीनीकरणासह, भारतीय सैन्याने खोऱ्यातील सीमावर्ती भागात पोहोचून परिस्थिती नियंत्रित केली, ज्यामुळे आज जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला आहे.
याच घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 26 ऑक्टोबर हा विलीनीकरण दिवस साजरा केला जातो. या दिवशी सुट्टी देखील जाहीर केली गेली आहे. यासोबतच 23 ऑक्टोबरला महाराजा हरिसिंह यांच्या जयंतीनिमित्त देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरचा विलय दिवस ही केवळ ऐतिहासिक घटना नाही तर ती संघर्ष आणि बलिदानाची कहाणी आहे जी भारतीयत्वाचे प्रतीक आहे. हा दिवस आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देतो आणि आपली संस्कृती आणि वारसा समजून घेण्यास आणि त्याचा आदर करण्याची प्रेरणा देतो.