Eknath Shinde : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्व पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान, महायुती (Mahayuti) आणि महाविकास (Maha Vikas Aghadi) आघाडीतील जागा वाटप जवळ-जवळ अंतिम टप्प्यात आले आहे.
महाराष्ट्रातील निवडणुक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पैठणच्या संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांचा आशीर्वाद घेतला आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेकडून (शिंदे गट) मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असता सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत.
राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. अशातच अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत असून, बड्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत.