Kerala News : दिवाळीपूर्वीच केरळमध्ये मोठा अपघात झाला आहे. केरळमधील कासरगोड येथील नीलेश्वरमजवळील एका मंदिरात टेंपल उत्सवादरम्यान एक मोठा अपघात झाला आहे. येथे काल रात्री एक भीषण दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे घडली आहे.
या दुर्घटनेत 154 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर जखमींपैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे जखमींवर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीनंतर अंजुतांबलम वीरारकवू मंदिराजवळ साठवण्यात आलेल्या फटाक्यांना आग लागली आणि नंतर ही घटना घडली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या आतषबाजी सुरु होती. यादरम्यान फटाक्यांची साठवणूक केलेल्या ठिकाणी फटाक्यांच्या ठिणग्या पडल्या आणि नंतर परिसरात मोठी आग लागली त्यामुळे येथे जमलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी पळापळी सुरु केली. या गोंधळात 154 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
VIDEO | Kerala: Over 150 people were injured, including eight seriously, in a fireworks accident during a temple festival near Neeleswaram, #Kasargod, late on Monday. The injured have been taken to various hospitals in Kasargod, Kannur, and Mangaluru.#KeralaNews #Kerala… pic.twitter.com/jGcrSxi31i
— Press Trust of India (@PTI_News) October 29, 2024
अपघातानंतर जखमींना लगेचच कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांसह जिल्हा प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आणि या दुर्दैवी घटनेतील बाधितांना मदत देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
फटाक्यांमुळे लागलेली आग आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण 154 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 97 जण विविध रुग्णालयात दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी 25 हजार रुपयांचे फटाके ठेवण्यात आले होते. या प्रकरणी आता मंदिर समितीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहेत.