Narendra Modi : मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्यात ५१ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची (Government jobs) नियुक्तीपत्रे दिली आहेत. यावेळी धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, ‘रोजगार मेळाव्यात 51 हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे सुपूर्द करताना आनंद होत आहे. पुढे पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, ‘भारत सरकार देशातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्यासाठी काम करत आहे. भाजप आणि एनडीए शासित राज्यांमध्येही लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. हरियाणात नवे सरकार स्थापन होताच 26 हजार तरुणांना नोकऱ्यांची भेट मिळाली आहे. हरियाणात सध्या उत्सवाचे वातावरण आहे.’
यंदाची दिवाळी खास!
मोदी पुढे म्हणाले, ‘दोन दिवसांनी देश दिवाळी साजरी करणार आहे. यंदाची दिवाळी खूप खास आहे कारण 500 वर्षांनंतर भगवान श्री राम अयोध्येतील त्यांच्या भव्य मंदिरात बसले आहेत आणि त्या भव्य मंदिरात बसल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. या दिवाळीच्या प्रतीक्षेत अनेक पिढ्या निघून गेल्या, लाखो लोकांनी बलिदान दिले, यातना सहन केल्या आहेत. अशा खास आणि भव्य दिवाळीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत.’ असे मोदींनी म्हंटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला रोजगार मेळावा आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये रोजगार मेळावा सुरू झाला होता, ज्यामध्ये आतापर्यंत 13 मेळ्यांमध्ये 8.5 लाखांहून अधिक तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी आर्थिक विकासाविषयी आणि रोजगाराच्या नव्या संधींबद्दल चर्चा केली आहे.