Narendra Modi : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची (AIIMS) बहुप्रतिक्षित हेली रुग्णवाहिका सेवा आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते या सेवेचे ऑनलाइन उद्घाटन पार पडले आहे. नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात ही सेवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
20 सप्टेंबर 2022 रोजी तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात या सेवेची घोषणा केली होती. आजच्या या कर्यक्रमाला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशिवाय केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, राज्याचे आरोग्य मंत्री धनसिंह रावत, अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल आणि खासदार त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते.
हेली रुग्णवाहिका ही सेवा केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने चालवली जाईल. या योजनेत दरमहा किमान 30 उड्डाणे आवश्यक असतील, जी गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत सुनिश्चित करतील. या उपक्रमामुळे लोकांना लवकर वैद्यकीय सुविधा मिळतील.
यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले की, ‘उत्तराखंडमधील AIIMS ऋषिकेश येथे सुरू झालेली हेली रुग्णवाहिका सेवा राज्यातील जनतेसाठी वरदान ठरेल. एक जीवन आणि एक क्षण, दोन्ही खूप मौल्यवान आहेत, असा पंतप्रधानांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले आहेत. या दोघांना एकत्र करून ही हेली रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. हृदयविकाराचा झटका किंवा रस्ता अपघात किंवा इतर कोणतीही गंभीर बाब घडल्यास हेली रुग्णवाहिका सेवेद्वारे रुग्णाला तत्काळ व परिणामकारक उपचार मिळू शकतात, असेही ते म्हणाले आहेत.
हेली रुग्णवाहिका म्हणजे काय?
हेली रुग्णवाहिका सेवा ही एक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आहे जी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जलद आणि सुरक्षित वाहतूक प्रदान करते. सामान्य रुग्णवाहिकेच्या तुलनेत हेली रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य होणार आहे.