Hezbollah New Chief : हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाहच्या (Hassan Nasrallah) मृत्यूनंतर हिजबुल्लाहला नवा प्रमुख मिळाला आहे. नसराल्लाहच्या हत्येनंतर जवळपास एक महिन्यानंतर नईम कासिम (Naim Qassem) याची हिजबुल्लाह प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नसराल्लाह याच्याकडे हिजबुल्लाची कमान होती तेव्हा नईम कासिम दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख होता. आता त्याची हिजबुल्लाहचा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
दहशदवादी संघटना हिजबुल्लाहने म्हंटले आहे की, ‘इस्राईली हवाई हल्ल्यात मारला गेलेला आपला नेता हसन नसराल्लाहच्या जागी नईम कासिमची निवड केली आहे. कासिम हा नसराल्लाह सोबत दीर्घकाळापासून होता. नसराल्लाहच्या मृत्यूपासून, कासिम दहशतवादी गटाचा कार्यकारी नेता म्हणून काम करत आहे. हिजबुल्लाहने मंगळवारी आपल्या नवीन प्रमुखाच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.
इस्राईलने सर्वप्रथम हमास प्रमुख इस्माइल हनियाची हत्या करून बदला पूर्ण केला आहे. यानंतर हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह याला मारण्यात इस्राईलला यश आले. यानंतर, इस्राईली संरक्षण दलापासून बराच काळ लपून बसलेल्या हमासच्या नवीन प्रमुखालाही याह्या सिनवारला पीएम नेतन्याहू यांच्या सैनिकांनी ठार केले आहे.
कोण आहे हिजबुल्लाहचा नवा प्रमुख नईम कासिम?
नईम कासिमचा जन्म दक्षिण लेबनॉनमधील केफर फिला शहरात झाला आणि त्याने अनेक वर्षे रसायनशास्त्राचे शिक्षक म्हणून काम केले आहे. मात्र, याआधी त्याने लेबनीज विद्यापीठातून रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले होते. याव्यतिरिक्त, त्याने धार्मिक अभ्यास देखील केला आणि मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी लेबनीज युनियनच्या स्थापनेत भाग घेतला होता. ही एक संस्था आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये धर्माप्रती जवळीक निर्माण करणे आहे.
नईम कासिमचा हिजबुल्लाहाशी संबंध
इस्राईलने लेबनॉनवर आक्रमण करून देशाच्या दक्षिणेकडील प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर 1982 मध्ये इराणच्या पाठिंब्याने हिजबुल्लाहची स्थापना झाली. 1991 पासून, कासिमने हिजबुल्लाहचा उप-महासचिव म्हणून काम केले आहे. सुरुवातीला त्याने नसराल्लाहच्या पूर्ववर्ती अब्बास मौसावी याच्या अंतर्गत काम केले होते, जो 1992 मध्ये इस्राईलने केलेल्या हवाई हल्ल्यात हल्ल्यात मारला गेला.