Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Elections) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशीही महायुती तसेच महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेसाठी महायुतीतील भाजपने एकूण १४८ उमेदवार जाहीर केले आहेत.
तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला ८५ आणि अजित पवार गटाला ५१ जागा आल्या आहेत. उर्वरित ४ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.
महायुतीतील भाजपाने पहिल्या यादीत सर्वाधिक ९९ उमेदवारांची घोषणा केली होती. तर दुसऱ्या यादीत २२, तिसऱ्या यादीत २५ आणि शेवटच्या म्हणजेच आज जाहीर केलेल्या यादी २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अशास्थितीत भाजपने एकूण १४८ उमेदवारांची घोषणा केली आहे.
तर शिवसेनेने (शिंदे गट) पहिल्या यादीत ४५, दुसऱ्या यादीत २०, तिसऱ्या यादीत १३ आणि चौथ्या यादीत ७ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पहिल्या यादीत ३८, दुसऱ्या यादीत ७, तिसऱ्या यादीत ४ आणि शेवटच्या यादीत २ उमेदवारांची घोषणा केली आहे. याशिवाय महायुतीने आपल्या मित्र पक्षांना ४ जागा दिल्या आहेत.
‘या’ तारखेला होणार मतदान
राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.