US Election 2024 : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (US Election 2024) आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचल्या आहेत. 8 दिवसांनी अमेरिकेचे राजकीय चित्र बदलणार आहे. निवडणुकीचा काळ जसजसा जवळ येत आहे, तसतशी ही लढत रंजक होत आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात ही लढत होत असून, यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणूक सर्वेक्षणात उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. सध्या, दोन ताज्या सर्वेक्षणांमध्ये दोघांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे.
डेमोक्रॅट पक्षाकडून कमला हॅरिस तर रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प निवडणूक रिंगणातअसून सीबीसी न्यूज आणि एबीसी न्यूजच्या निवडणूक सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात फक्त 19-20चा फरक आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नुकताच एक सर्वेक्षण अहवाल समोर आला असून, त्यामुळे निवडणुकीची सर्व समीकरणे बदलली आहेत. सर्वेक्षण अहवालाच्या निकालावरून असे दिसून आले आहे की, कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रम्प यांच्या थोड्या पुढे चालत आहेत. कमला हॅरिस यांना आघाडी मिळत असल्याचे चित्र सर्वेक्षणातून पाहायला मिळत आहे.
मंगळवारी प्रकाशित झालेल्या रॉयटर्स/इप्सॉस पोलनुसार, कमला हॅरिस यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा केवळ एक टक्का आघाडी मिळाली आहे. या आकडेवारीवरून दिसून येते की, दोन्ही उमेदवारांमध्ये बरोबरीची टक्कर होत आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कमला हॅरिस यांना 44 टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना ४३ टक्के जनतेचा पाठिंबा मिळाला आहे.
निवडणूक कधी आहे?
निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येईल तसतशी मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यात यशस्वी होणारी मोहीम राष्ट्रपतीपदावर विजय मिळवेल, असे अमेरिकेतील निवडणूक तज्ज्ञांचे मत आहे. ज्या सात प्रमुख राज्यांमध्ये राष्ट्रपतीपदाची लढत निश्चित होणार आहे, तेथे हे विशेषत: खरे ठरेल. अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस शेवटच्या क्षणी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.