Maharashtra Assembly Elections : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल आता वाजले असून, राजकारण चांगलेच रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
याचदरम्यान, सर्व प्रक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु झाली आहे. नुकतीच भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपकडून 40 स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सात सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी 12, 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. पुण्यात 12 नोव्हेंबरला त्यांची सभा होणार आहे. तर सलग तीन दिवस पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेवटची सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जारी केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदींसह राज्यातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, डॉ. प्रमोद सावंत, भुपेंद्र पटेल, विष्णू देव साई, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, नायब सिंग साईनी, हिमंता बिस्वा सर्मा, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी, शिव प्रकाश, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल यांचाही समावेश करण्यात आला आहे.