Israel and Iran War : इराण ( Iran) आणि इस्राईल (Israel) यांच्यात सध्या मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू आहे. इराणने नुकत्याच केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्राईलच्या लष्करप्रमुखांनी इराणला इशारा दिला आहे. जर इराणने पुन्हा हल्ला केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे म्हंटले आहे.
गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांच्यावर इस्राईलची कारवाई सुरूच आहे. अशातच इराणने कोणत्याही प्रकारे हल्ला करण्याची चूक केली तर त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे इस्राईलचे लष्करप्रमुख हर्झी हालेवी यांनी म्हंटले आहे.
इराणला मोठी किंमत मोजावी लागेल
इस्राईलचे लष्करप्रमुख म्हणाले की, ‘इराणने जर पुन्हा हल्ला केला तर यावेळी आम्ही आमच्या क्षमतेचा अशा प्रकारे वापर करू, जो यापूर्वी कधीही केला नाही. जर इराण पुन्हा एकदा हल्ल्याची तयारी करत असेल तर यावेळी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. असे हलेवी यांनी म्हंटले आहे. त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा शनिवारीच इस्राईलने इराणवर बदला म्हणून हल्ला केला होता.
इस्राईलच्या हल्ल्यामुळे इराणचे मोठे नुकसान
या महिन्याच्या सुरुवातीला इराणने केलेल्या मोठ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी इस्राईलने इराणच्या लष्करी तळांवर आणि क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रांवर हल्ले केले आहेत. यामध्ये इराणचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, इस्त्राईलचे हिजबुल्लाहविरोधातही हल्ले सुरूच आहेत. इस्राईली रणगाडे लेबनॉनमधील खियाम गावाच्या हद्दीत घुसले आहेत. तर मंगळवारी हमासविरुद्ध गाझामधील निवासी भागावर इस्राईलने मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले आहे.