Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मंगळवारी (29 ऑक्टोबर) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचा मुलगा जीशान सिद्दीकी (Zeeshan Ziauddin Siddique) याच्या फोनवर ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीप्रकरणी पोलिसांनी नोएडा येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. हे प्रकरण मुंबई, नोएडा आणि दिल्लीशी जोडलेले दिसत आहे.
मंगळवारी सकाळी सलमान खानला जीशान सिद्दीकीच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातून फोनवर धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुरफानला नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तर दुसरीकडे मोहम्मद तय्यब या आरोपीवर मुंबई कंट्रोल रूमच्या नंबरवर ‘आम्ही सलमान खानला सोडणार नाही, हा आमचा शेवटचा इशारा आहे’ असा मेसेज केल्याचा आरोप आहे.
धमकीचा मेसेज येताच मुंबई पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी तत्काळ त्या नंबरचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली होती. मोबाईलचे लोकेशन दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सेक्टर 92 असल्याचे आढळून आले होते. मुंबई पोलिसांनी तात्काळ नोएडा पोलिसांशी संपर्क साधून धमकी देणाऱ्या व्यक्तीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तय्यबला नोएडाच्या सेक्टर 39 येथून अटक केली.
नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी मोहम्मद तय्यब हा बरेलीचा रहिवासी असून तो सध्या नोएडा येथील एका घरात सुताराचे काम करत होता. तैयबने चौकशीदरम्यान सांगितले की, तो दिल्लीतील कर्दमपूर भागात काकासोबत राहत होता. मुंबई पोलीस आणि नोएडा पोलीस मोहम्मद तय्यबची संयुक्त चौकशी करत होते. या बहाण्याने काही पैसे मिळावेत म्हणून हा मेसेज गंमतीने पाठवल्याचे तय्यबने चौकशीदरम्यान सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात मोहम्मद तय्यबचा लॉरेन्स किंवा इतर कोणत्याही गुंडाशी संबंध असल्याचे समोर आलेले नाही. मुंबई पोलीस आरोपी तय्यबला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला घेऊन जात आहेत. तपास वळवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी खोटे बोलत असल्याचा मुंबई पोलिसांना संशय आहे.