महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून राज्यभरात विविध रणनीती आखल्या जात आहेत. दोन्ही बाजूंनी स्टार प्रचारकांचा मेळा सज्ज झाला आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मोठ्या सभा घेणार आहेत. यातील पहिली सभा धुळ्यात ८ नोव्हेंबर रोजी मालेगाव रोडवरील खान्देश गो शाळेच्या मैदानावर होईल. या भव्य सभेला तब्बल ४५ एकरात व्यवस्था करण्यात आली असून एक लाख नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे.
मोदी यांची सभा फक्त धुळ्यातच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव बाह्य भागात देखील होणार आहे . १४ नोव्हेंबरपर्यंत नरेंद्र मोदी राज्यात प्रचार सभांमध्ये भाग घेतील. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित राहतील. महायुतीने स्टार प्रचारक म्हणून ४० प्रमुख नेत्यांची नियुक्ती केली आहे. यात जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तयारीत आहे. काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश केला असून त्यांची प्रमुख नेते प्रचारात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा प्रचार शरद पवार आणि सुप्रिया सुळे सांभाळतील तर अजित पवार गटाचा प्रचार अजित पवारच सांभाळणार आहेत. शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उबाठाच्या प्रचाराला गती देणार आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही एकत्रित प्रचारसभाही घेणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील वातावरण अधिक तापले आहे. दिवाळीनंतर सर्वच पक्षांनी राज्यभर प्रचाराची धडाडीने तयारी केली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक प्रचार अधिकाधिक रोमहर्षक होईल अशी अपेक्षा आहे.