Maharashtra Assembly Election 2024 : महानगरपालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. ऐन विधानसभेच्या (Maharashtra Assembly Election) तोंडावर रवी राजा यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. आज (गुरुवारी) रवी राजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
रवी राजा यांच्या प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा दावा केला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले आहेत की, अनेक बडे नेते रवी राजा यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
रवी राजा यांच्या या निर्णयाने काँगेसला विधानसभेत मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता फडणवीसांनी एक मोठा ‘बॉम्ब’ फोडला आहे. रवी राजा यांच्या पाठोपाठ अनेक बडे नेते भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले आहे. तसेच फडणवीसांनी पुढे राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
रवी राजा पक्षाच्या निर्णयावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. रवी राजा यांना सायन कोळीवाडा या ठिकाणाहून तिकिट हवे होते. मात्र, काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
रवी राजा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांन राजीनामा पत्र पाठवले आहे. आपल्याला सलग दोनदा डावललं गेलं आहे त्यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहोत असं रवी राजा यांनी म्हटलं आहे.