Amit Shah : मोदी सरकारच्या पुढील कार्यकाळात देशभर समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले आहे. ‘भाजप सत्तेत परत आल्यास सर्व बाबींचा विचार करून तसेच चर्चा करून यूसीसी कायदा आणला जाईल. असे अमित शहांनी एका मुलाखतीदरम्यान म्हंटले आहे. ते म्हणाले, मोदी सरकारचा पुढील कार्यकाळ अनेक अर्थाने महत्त्वाचा असणार आहे. कारण या काळात एक देश, एक निवडणूक कायदा लागू होईल. आता वेळ आली आहे की देशभरात एकाच वेळी निवडणुका झाल्या पाहिजेत.’ असेही अमित शाह यावेळी म्हणाले आहेत.
समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी आमची : अमित शाह
अमित शहा म्हणाले, ‘समान नागरी संहिता ही आपल्यावर जबाबदारी आहे, जी आपल्या संविधान निर्मात्यांनी आपल्यावर, आपल्या संसदेवर आणि राज्य विधानमंडळांवर सोडली आहे. संविधानात आपल्यासाठी मांडलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समान नागरी संहिता देखील समाविष्ट आहे. त्यावेळीही के.एम.मुन्शी, राजेंद्र बाबू, आंबेडकर जी यांसारख्या कायदेपंडितांनी सांगितले होते की, धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित कायदे नसावेत, समान नागरी कायदा असावा.’
शाह पुढे म्हणाले की, ‘भाजपने उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करून एक प्रयोग केला आहे कारण हा राज्य आणि केंद्र या दोघांचा विषय आहे. समान नागरी संहिता 1950 पासून आमच्या अजेंड्यावर आहे आणि अलीकडेच उत्तराखंड या भाजपशासित राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अमित शाह म्हणाले, ‘मला वाटते समान नागरी संहिता ही एक मोठी सामाजिक, कायदेशीर आणि धार्मिक सुधारणा असेल.’
शाह म्हणाले, ‘या मुद्द्यावर व्यापक चर्चा व्हायला हवी आणि जर काही बदल आवश्यक वाटत असेल तर तो बदल उत्तराखंड सरकारने करायला हवा. हे प्रकरण निश्चितपणे कोर्टात जाईल आणि न्यायपालिकाही त्यावर आपले मत देईल. यानंतर राज्याच्या विधानसभा आणि संसदेनेही याचा गांभीर्याने विचार करून कायद्याची अंमलबजावणी करावी. ते पुढे म्हणाले, ‘भाजप संपूर्ण देशात समान नागरी संहिता लागू करणार असल्याचेही आम्ही आमच्या ठराव पत्रात लिहिले आहे. पुढे येत्या पाच वर्षांत देशात समान नागरी संहिता लागू होईल का? त्यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले, ‘पुढच्या टर्ममध्ये असे होऊ शकते. त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी पुरेसा आहे.’
एक देश एक निवडणूक
पुढे एक देश एक निवडणूक याविषयी विचारलेल्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, ‘पीएम मोदींनी रामनाथ कोविंद समिती स्थापन केली आहे. मी पण त्याचा सदस्य आहे. हा अहवाल सादर झाला असून आता अशी वेळ आली आहे की देशात एकाच वेळी निवडणुका घ्याव्यात. येत्या पाच वर्षांतच त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शाह यावेळी म्हणाले आहेत. शाह म्हणाले, ‘एकाच वेळी निवडणुका घेतल्याने निवडणुकीचा खर्चही कमी होईल.’