Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, प्रचाराला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात.
अशा परिस्थितीत दुपारनंतरच राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीला पक्षांतर्गत बंडखोरांची चिंता सतावत आहे. आणि म्हणूनच दिवाळीत सर्व पक्षश्रेष्ठींनी या बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता हे बंडखोर आज उमेदवारी अर्ज माघारी घेणार का? की लढत देऊन दोन्ही आघाड्यांचे टेन्शन वाढवणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.
विधानसभेत महाविकास आघाडी व महायुतीती या दोन प्रमुख पक्षांमध्ये खरी लढत होणार आहे. यावेळी निवडणुक लढवण्याची अनेकांची इच्छा होती. यावेळी पक्ष प्रमुखांना प्रत्येकाला संधी देता न आल्याने अनेकांनी बंडाचे हत्यार उपसले. आणि विधानसभेपूर्वी राज्यात बहुतांश मतदार संघात बंडखोरी पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी युती-आघाडीतील मित्रपक्षांनीच एकमेकांविरोधात अर्ज दाखल केल्याने तिढा वाढला आहे. या उमेदवारांमुळे थेट निकालावर परिमाण होऊ शकतो. यामुळे दोन्ही आघाड्यांचे टेन्शन वाढले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 7,995 उमेदवारांनी 10,905 उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत. महाराष्ट्रातील एका टप्प्यातील निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. अर्जाची छाननी झाल्यानंतर आज 4 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.