Manoj Jarange Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, प्रचाराला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात.
अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. सुरुवातील २८८ जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगेंनी केली होती. मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आपला निर्णय पत्रकार परिषदेत दिला आहे.
मनोज जरांगेंनी यांनी आज सकाळी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत आपला निर्णय जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी त्याचे कारणही सांगितले आहे. ते म्हणाले, “आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. असे कारण यावेळी जरांगेंनी दिले आहे.
निवडणूक जाहीर होताच जरांगें पाटील निवडणुकीच्या कामाला लागले होते. त्यांनी १३- १४ जागांवर उमेदवार देखील जाहीर केले होते. मात्र आता त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.