Election Commission : केरळ, पंजाब आणि यूपीमध्ये १३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुका आता २० नोव्हेंबरला होणार आहेत. विविध सणांमुळे निवडणूक आयोगाने मतदान आठवडाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 13 नोव्हेंबर रोजी होणारे मतदान पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेस आणि भाजपसह अनेक पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
पक्षांनी सांगितले होते की, अनेक सणांमुळे १३ नोव्हेंबरला मतदान कमी होऊ शकते. मात्र, निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीचे निकालही त्याच दिवशी लागणार आहेत.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणूक आयोगाला निवेदन देऊन यूपीमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखा बदलण्याची मागणी केली होती. भाजपच्या शिष्टमंडळाने आपल्या निवेदनात म्हटले होते की, ’15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेमुळे कुंडरकी, मीरापूर, गाझियाबाद आणि प्रयागराजमध्ये तीन ते चार दिवस आधीच लोक जमतात. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने कार्तिक पौर्णिमा लक्षात घेऊन तारखांमध्ये बदल करावा. 13 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरला निवडणुका घ्याव्यात, अशी भाजपची मागणी होती.
Election Commission has rescheduled bypolls in the assembly constituencies of Kerala, Punjab, and Uttar Pradesh from November 13 to November 20, considering the upcoming festivals. The decision was made in response to requests from parties including Congress, BJP, BSP, RLD, and… pic.twitter.com/ue3FWTABGS
— IANS (@ians_india) November 4, 2024
केरळमध्ये पलक्कड या एकमेव विधानसभा मतदारसंघात 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार होती. पंजाबमध्ये डेरा बाबा नानक, चब्बेवाल, गिद्देरबहा आणि बर्नाला या चार मतदारसंघात याचदिवशी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता तारीख पुढे ढकलत २० नोव्हेंबर करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात 20 नोव्हेंबरला 9 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, ज्यात मिरापूर, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, करहल, सिशामाऊ, फुलपूर, कटेहरी आणि माझवान या नऊ मतदारसंघात समावेश आहे. अशास्थितीत आता उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी मिळणार आहे.