Maharashtra New DGP : संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांना या पदावरून हटवण्यात आल्यानंतर संजय वर्मा यांची वर्णी लागली आहे.
डीजीपी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवल्यानंतर, ईसीआयने राज्य सरकारकडे महाराष्ट्र केडरमधील तीन सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागवली होती, ज्यापैकी वर्मा हे एक आहेत.
1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
IPS संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते एप्रिल 2028 मध्ये सेवानिवृत्त पोलीस सेवेतून निवृत्त होतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या डीजीपी पदासाठी ज्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती, त्यात त्यांचे आघाडीवर होते.
निवडणूक आयोगाकडे रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी
डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याबाबत राजकीय पक्षांमध्ये काही काळ वातावरण तापले होते. काँग्रेसनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटानेही निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली होती. काँग्रेसने रश्मी शुक्ला यांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित करत त्यांना महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
काँगेसच्या मागणीनंतर रश्मी शुक्ला यांना पदावरून काढत तातडीने त्यांची बदली केली आहे. त्यानंतर राज्याच्या नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी ३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन जणांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. आज निवडणूक आयोगाने संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते लवकर सर्व सूत्रे हाती घेतील.