US Presidential Election 2024 : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Election 2024) मतदान झाल्यानंतर आता मतमोजणी सुरू आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यात चुरशीच्या लढत होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज साकळपासून डोनाल्ड़ ट्रम्प कमला हॅरिस यांच्या पुढे दिसत आहेत. नुकतीच समोर आलेल्या आकडेवारीनुसार डोनाल्ड़ ट्रम्प 247 जागांवर तर कमला हॅरिस 214 जागांवर आघाडीवर आहेत. काही वेळापूर्वी कमला हॅरिस ट्रम्प यांच्या बऱ्याच मागे होत्या. मात्र, आता कमला हॅरिस यांनी देखील वेग पकडला आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे यापूर्वी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाचे जो बायडेन यांनी त्यांचा पराभव केला होता. कमला हॅरिस या बायडेन प्रशासनात उपाध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी आपला जोरदार दावा मांडला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान सुरुवातीला अमेरिकन लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ट्रम्प यांचे लक्ष भारतीय वंशाच्या लोकांवर होते. त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दाही उपस्थित केला होता. भारतीय वंशाच्या लोकांमध्ये कमला हॅरिस यांची मजबूत पकड आहे. हॅरिस या भारतीय वंशाच्या अमेरिकन महिला आहेत. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी प्रचारावेळी भारतीय वंशाच्या लोकांवर देखील लक्ष केंद्रित केले आहे.