Devendra Fadnavis : ‘भारत जोडो हा एक समूह तयार करण्यात आला आहे. या समुहात अशा अनेक संघटना आहेत ज्या अतिशय डाव्या विचारसरणीच्या आहेत. ज्यांची ध्येय धोरणे, कामाची पद्धत पाहिली तर अराजक पसरवणारी ही यंत्रणा आहे.’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) केला आहे.
कोल्हापूरमधून माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता निर्माण करण्याचे काम होत आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही. अर्बन नक्षलवादचा अर्थ लोकांची मने प्रदूषित करायची, कलुषित करायची, अराजकतेचे रोपण करायचे जेणेकरून त्यांचा देशातील संस्था, यंत्रणांवरील विश्वास उडेल आणि देशाच्या एकतेला धोका होईल. आज हेच काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याचदरम्यान आज महायुतीतील तिन्ही पक्षांनी कोल्हापुरात प्रचार सभा घेतली आहे. या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी मद्यमांशी सवांद साधला तेव्हा त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांच्या भारत जोडो यात्रा मोहिमेवर टीका केली आहे.