US Presidential Election : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Election) मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान, अमेरिकन न्यूज चॅनेल फॉक्स न्यूजने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना विजय मिळाल्याचे जाहीर केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा 277 चा आकडा पार केला आहे. तर कमला हॅरिस 226 मतांवर आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान, दोन्ही नेत्यांचे संपूर्ण लक्ष 7 स्विंग राज्यांवर होते. ज्यात ट्रम्प आघाडीवर आहेत. यापैकी दोनमध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प या देखील ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये आहेत. ट्रम्प यांनी बहुमत मिळाल्यानंतर सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील सर्वात मोठा राजकीय क्षण असल्याचे ट्रम्प यांनी म्हंटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्विंग राज्याच्या मतदारांचे देखील आभार मानले आहेत. विजयाचा आनंद व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले, ‘मी तुमच्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी लढणार आहे. स्विंग राज्यांतील मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो पुढील चार वर्षे अमेरिकेसाठी सोनेरी काळ असेल. आम्हाला जनतेची साथ मिळाली आहे. पुढे ट्रम्प म्हणाले की, ‘आजच्या आधी असे दृश्य पाहिले नव्हते. आम्ही आमच्या सीमा मजबूत करू आणि देशाचे सर्व प्रश्न सोडवू.’
चार वर्षांत पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये बहुमत मिळाले आहे. सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे 51 आणि डेमोक्रॅट पक्षाचे 49 खासदार आहेत.