PM Vidyalaxmi Scheme : मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेला (PM Vidyalaxmi Scheme) मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, ‘या योजनेंतर्गत 3 टक्के व्याज अनुदानाद्वारे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील मुलांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने पंतप्रधान विद्यालक्ष्मी ही नवीन केंद्रीय योजना मंजूर केली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. आर्थिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नव्हते, त्यांना या योजनेअंतर्गत आता फायदा होणार आहे. विद्यार्थी आता कोणत्याही अडचणीशिवाय उच्च शिक्षण घेऊ शकतील.
कोणत्याही हमीदाराशिवाय मिळणार कर्ज
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत दर्जेदार उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही तारण किंवा हमीशिवाय बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळू शकेल, ज्यात शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम आणि संबंधित इतर खर्चाचा समावेश असेल.
22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
या योजनेची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, ‘देशातील सर्वोच्च 860 दर्जेदार उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यात येणार असून, त्याअंतर्गत दरवर्षी 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना सरकारकडून कर्ज दिले जाणार आहे.’
Union Cabinet, under the leadership of Hon'ble PM Shri @narendramodi ji, approves the PM-Vidyalaxmi scheme with an outlay of ₹3,600 crore to provide financial support to meritorious students.
This transformative decision ensures that financial constraints will no longer prevent… pic.twitter.com/Y8U8qPCBh6— Kiren Rijiju (@KirenRijiju) November 6, 2024
या योजनेअंतर्गत, 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 75 टक्के क्रेडिट गॅरंटी दिली जाईल, ज्यामुळे बँकांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. याव्यतिरिक्त, ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे आणि जे इतर सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज लाभांसाठी पात्र नाहीत त्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत दिली जाईल. दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ही मदत दिली जाणार असून, सरकारी संस्थांमधून तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे.
असा करू शकतात अर्ज
विद्यार्थी या योजनेसाठी “पीएम-विद्या लक्ष्मी” या पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात, जे सर्व बँकांसाठी समान अर्ज प्रक्रिया प्रदान करेल. कर्जावरील व्याज सवलत ई-व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) वॉलेटद्वारे दिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सरळ असेल.