Yogi Adityanath : ‘एकीकडे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या रुपात महाअनाडी युती आहे. महाअनाडी यासाठी म्हणत आहेत, कारण यांना देश आणि धर्माची चिंता नाही.’ अशी टीका उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती तसेच महाविकास आघाडीसोबत इतर सर्व पक्ष मैदानात उतरले असून, विविध ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करत आहेत. अशातच महायुतीच्या प्रचारासाठी राज्यात केंद्रातील बडे नेते मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, आज (६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वाशीम दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहनही केले आहे.
सभेला संबोधित करताना योगी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन भूमीवर मला जनतेशी संवाद साधण्याचा पुन्हा योग मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष भारताच्या स्वाभिमान आणि सन्मानचा संघर्ष होता. औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले.
काँग्रेसने बरेच वर्ष देशात सरकार चालवले मात्र इमानदारीने कधीही गरीब वर्गासाठी काम केले नाही. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभव करणारी हीच काँग्रेस आहे. पाकिस्तानी आतंकवाद, चीन भारताच्या प्रदेशात अतिक्रमण करून शिरकाव करायचा आणि आम्ही यावर जेव्हा आवाज उठवायचो तेव्हा काँग्रेस बोलत असे, शांत बसा नाहीतर देशाचे संबध बिघडतील. काँग्रेसला देशाची नाहीतर संबंधांची चिंता होती. मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये हा नवा भारत आहे. जर भारताच्या सीमांवर अतिक्रमण कराल तर ‘राम-राम सत्य है’ अशी यात्रा निघेल’., असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले आहेत.
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.