Pune : भाजप नंतर आता काँग्रेसनेही (Congress) बंडखोरांवर कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly election) उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यांच्यावर आता काँग्रेसने कारवाई केली आहे.
अलीकडेच भाजपने तब्बल 40 बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. अशातच आज काँग्रेसने पाच बंडखोर नेत्यांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.
यामध्ये पुण्यातील दोन काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. यात पर्वतीत ‘आबा बागुल’ तर कसबा पेठ मतदारसंघात ‘कमल व्यवहारे’ यांना काँग्रेस मधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, पक्षाच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी 13,16 आणि 17 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. तसेच काँग्रेसचे जेष्ठ राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खर्गे पाच दिवस महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. तसेच येत्या 10 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याची माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.