Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Assembly Elections 2024) सर्वत्र प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीकडून राज्यात विविध भागात प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील एका पाठोपाठ प्रचार सभा घेतायेत. आज फडणवीसांनी नांदेडच्या किनवट मतदार संघात प्रचार सभा घेतली आहे.
यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांवर देखील जोरदार टीका केली आहे. जर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर ते लाडकी बहीण योजना बंद करतील असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, ‘लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून मविआचे लोक कोर्टात गेले आहेत. शिवाय जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर उद्धव ठाकरे ही योजना बंद करणार आहेत. त्यांनी तसे जाहीर पणे सांगितले आहे. महायुतीच्या योजना आम्ही बंद करणार असे ते सांगत आहे. शरद पवार आणि नाना पटोले ही असचं बोलत आहे.
किनवट विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार भिमराव केराम यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी ते बोलत होते. महायुती सरकारने अडीच वर्षात ट्वेंटी ट्वेंटीची बॅटींग केली आहे. आता पुढील पाच वर्ष आम्ही अशी बॅटींग करू की एकही प्रश्न शिल्लक राहाणार नाही असा दावाही फडणवीसांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या पक्षाच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. कोल्हापूर येथून अमित शाह प्रचाराला सुरुवात करतील. उद्या (शुक्रवारी) राज्यात अमित शहांच्या चार सभा पार पडणार आहेत.