Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) सर्व राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. याचदरम्यान, उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाच्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या उमेदवार भारती कामडी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
कोण आहेत भारती कामडी?
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारती कामडी यांची २०२० मध्ये निवड झाली होती. भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत चार लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून भारती कामडी यांनी दीड वर्ष काम केले आहे. सध्या त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा ठाकरे गटाच्या महिला संघटिका आहेत. सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या कामडी यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर आहे.
2024 च्या लोकसभेचा निकाल
पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला होता. सावरा यांना 6 लाख 1 हजार 244 मते मिळाली होती. तर कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मतं मिळाली होती. दोन्ही उमेदवारांमध्ये 1 लाख 83 हजार 306 मतांचा फरक होता.