Poonam Mahajan : ‘माझ्या वडिलांच्या हत्येमागे निश्चितच काहीतरी मोठं षडयंत्र आहे. तसंच या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी, असा प्रचंड मोठा आणि खळबळजनक दावा भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी केलाय. त्यांचे वडील, भाजपचे जेष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्या हत्येबाबत मोठा दावा त्यांनी केला आहे. तसंच या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत त्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. पूनम महाजन (Poonam Mahajan) यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पूनम महाजन यांनी ‘मुंबई तक’ या माध्यमाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येवर भाष्य केलं. यावेळी बोलताना “मी गेल्या काही वर्षांपासून याबाबत बोलत आहे. ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली, त्या बंदुकीचे आणि गोळीचेही पैसे प्रमोद महाजन यांचे होते. कोणी कोणावर रागाने असा अन्याय करतं तेव्हा तुम्ही एखाद्या व्यवस्थेचं, यंत्रणेचं उल्लंघन करत असता. हे मी पहिल्यापासूनच बोलत आहे. माझ्या वडिलांवर गोळ्या झाडणारे हात, गोळी त्या माणासाचे होते. त्या व्यक्तीचा त्यामागे काहीतरी राग असेल. पण त्या हत्येमागचं कारण आणि ती बुद्धी फक्त एका कोणत्यातरी फालतू भांडणाची नाहीये, असा दावा त्यांनी केला. तसेच, माझ्या वडिलांच्या हत्येमागे काहीतरी खूप मोठं कारण आहे. मी त्या कारणाला कधी राजकीय म्हटले नाही. पण त्या हत्येमागे काहीतरी मोठं कारण आहे. त्यामागे षडयंत्र आहे, असं दिसतं, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा म्हणून मी मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांना याबाबत पत्र लिहिणार आहे, असंही त्या पुढे म्हणाल्या.त्या पुढे म्हणाल्या की मी २००७ – ०८ साली याबाबत जेव्हा बोलत होते, तेव्हा सत्ता आपली नव्हती. किंवा कदाचित मला तेवढं गांभीर्याने घेण्यात आलं नव्हतं. पण मी आज या परिस्थितीत आहे, मी त्या प्रकरणावर आज बोलू शकते.
दरम्यान, सध्या राज्यात निवडणूकिचा माहोल चालू आहे. त्यामुळे या प्रकरणाला सनसनाटी मिळायला नको. माझ्या या मागणीचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. अगोदर मी गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, अशी माहितीही पूनम महाजन यांनी दिली. पण नक्कीच यामागे फक्त राजकीय फुटेज मिळवण्याचा हेतु आहे बाकी दुसरं काहीच नाही, असं मत काही विरोधकांच आहे.
प्रमोद महाजन यांचा मुत्यू कसा झाला?
प्रमोद महाजनांचा मृत्यू होऊन 18 वर्ष झाली आहेत. पण एक प्रश्न अजूनही असा आहे की प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांची हत्या का केली? २२ एप्रिल २००६ रोजी मुंबईतील वरळी येथील पूर्णा १२०२ या फ्लॅटमध्ये सकाळी सात वाजता प्रमोद महाजन यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. यात त्यांचा मृत्यू झाला होता.
भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर नाशिक जेलमध्ये प्रवीण महाजन यांनी ‘माझा अल्बम’ नावाचे एक पुस्कत लिहिले. या पुस्तकामुळे बरेच वाद निर्माण झाले होते. प्रवीण महाजन यांच्या पुस्तकातील काही भाग वर्तमानपत्रातही छापण्यात आला होता. त्यात प्रवीण यांनी “हे सर्व कसं घडलं. आणि कोणी केलं. हे लोकांना कधीच कळणार नाही,” असं म्हंटले होते. प्रवीण महाजन यांचा मेंदूतील रक्त रक्तस्त्रावामुळे 3 मार्च 2010 रोजी मृत्यू झाला आहे.