Narendra Modi : जोपर्यंत माझ्यावर देशाच्या जनतेचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला 370 कलम पुन्हा आणता येणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून देण्यात आला आहे. आज धुळ्यात आयोजित प्रचार सभेला पंतप्रधान मोदी संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (शुक्रवारी) धुळे जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा पार पडली आहे. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून जम्मू काश्मीरमधून भारताचे संविधान हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
जम्मू काश्मीरच्या विधिमंडळात सध्या कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यावरून जोरदार गदारोळ सुरू आहे. विधिमंडळात दोन दिवसांपासून या मुद्द्यावरून वाद सुरु आहेत. याच मुद्द्यावरून धुळ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँगेसला इशारा दिला आहे.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ‘काँग्रेसने मित्र पक्षांसोबत मिळून सत्ता मिळवताच जम्मू-काश्मीरमध्ये कट रचण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेत जे काही सुरु आहे ते तुम्ही पहिले असेलच. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने कलम 370 पुन्हा लागू करण्याचे विधेयक मंजूर केले आहे. देश हे स्वीकार करेल का? तुम्ही याच्याशी सहमत आहात का? काश्मीरला तोडण्याचा काँग्रेसचा हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? असे प्रश्न पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित केले आहेत.
पुढे पंतप्रधान म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू झाले आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना हे सहन होत नाहीये. पण मी काँग्रेस आणि इथल्या आघाडीतल्या लोकांना सांगू इच्छितो पाकिस्तानच्या अजेंड्याला देशात प्रोत्साहन देऊ नका. फुटिरतावाद्यांना साथ देऊ नका. जोपर्यंत मोदीवर जनतेचा आशीर्वाद तोपर्यंत काश्मीरमधून बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हटवू शकत नाही. जगातील कुठलीही शक्ती जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू शकत नाही,” असा इशाराही यावेळी पंतप्रधानांनी दिला आहे.