Kamala Harris : उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऐतिहासिक मोहीम राबवूनही त्यांना अमेरिकन जनतेची साथ मिळाली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभूत होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. यापूर्वी 2016 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनाही ट्रम्प यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. कमला हॅरिस यांच्या पराभवामागील एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उशीरा प्रवेश झाला असल्याचे म्हंटले जात आहे.
कोणत्याही उमेदवाराचा विजय किंवा पराभव यामागे काही कारणे असू शकतात, असेच काहीसे कमला यांच्याबाबतीतही घडले आहे. पण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा खूप उशिरा करण्यात आली हे मुख्य कारण मानले जात आहे. कमला हॅरिस यांचा पराभव होण्यामागे प्रमुख कारणे कोणती आहेत? पाहूया
नावाची घोषणा करण्यास उशीर
अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा करण्यास उशीर झाला. अशापरिस्थितीत हॅरिस यांनी निवडणुकीच्या शर्यतीत खूप उशीरा प्रवेश केला आणि जेव्हा त्या शर्यतीत सामील झाल्या तेव्हा ट्रम्प आधीच बायडेन यांच्या खूप पुढे होते. बायडेन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यायची नव्हती, पण त्यांची स्थिती लक्षात घेऊन पक्षाने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. कमला यांच्या व्यतिरिक्त अनेक नावांची चर्चा झाली होती. मात्र, शेवटी कमला यांच्या नावाला मंजुरी मिळाली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
याव्यतिरिक्त, कमला हॅरिस या लोकशाही मुद्द्यांमुळेच आपला विजय निश्चित होईल या कल्पनेवर ठाम होत्या. अनेक टीव्ही मुलाखतींमध्ये कमला हॅरिस ट्रम्प यांच्याप्रमाणे आपले विचार मांडू शकल्या नाहीत. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्यातील आत्मविश्वासाच्या अभावामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा फटका बसला.
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार
जो बायडेन यांचे काही निर्णय होते जे डेमोक्रॅटिक पक्षाच्या पराभवाचे कारण आहे. यातील पहिला म्हणजे अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेणे, त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेची विश्वासार्हता कमकुवत झाली. ज्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.
पुतिन यांना कमी लेखणे
बायडेन यांच्या सरकारने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियाला कमी लेखले ज्यामुळे पुतिन यांना पुढे जाण्याची संधी मिळाली, आणि त्यांनी पश्चिमेतील कमजोरपणा पाहिला आणि युक्रेनवर आक्रमण केले. युक्रेन युद्ध हा बिडेनसाठी महत्त्वाचा विजय ठरू शकला असता. युद्धादरम्यान विविध टप्प्यांवर, युक्रेन विजयासाठी तयार असल्याचे दिसून आले परंतु ते सुरक्षित करण्यासाठी पश्चिमेकडून भरपूर पैसा आणि शस्त्रे आवश्यक होती, जी बायडेन सरकारने प्रदान केली नाही.
बायडेन यांनी ही संधी गमावली, ज्याने पुतिन यांच्या मोहिमेला पुनरुज्जीवित केले आणि असंख्य युक्रेनियन लोकांना जीव गमवावा लागला. निर्णायक नेतृत्वाऐवजी, अमेरिकन धोरणाने मित्र राष्ट्रांना एकत्र करण्याचा प्रयत्न दर्शविला. शेवटी युक्रेनला विजय मिळवण्यासाठी पुरेसा पाठिंबा देण्यात ते अपयशी ठरले.
इस्राईल युद्ध
इस्राईलचा इराण विरुद्ध तसेच दहशदवादी संघटना हिजबुल्लाह विरुद्ध सुरु असलेल्या संघर्षात अमेरिकेकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे मुस्लिम मतदारांनी हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला नाही. यावेळी बायडेन प्रशासनावर अनेक आरोप करण्यात आले. निवडणुकीपूर्वी लेबनॉनवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्त्राईलने याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचे वक्तव्य अमेरिकेकडून करण्यात आले होते, त्यानंतर लोकांचा बायडेन प्रशासनावरील विश्वास कमी झाला होता.
प्रदीर्घ काळ चाललेले युद्ध संपवण्यासाठी अमेरिका वारंवार प्रयत्न करत राहिली पण त्यात यश आले नाही. अमेरिकेच्या शांत बसून पाहण्याच्या भीमकेवर मुस्लिम मतदार पूर्णपणे कंटाळले आणि त्यांनी हॅरिस यांना पाठ फिरवली.
भारतीयांमध्ये नाराजी
कॅनडातील निज्जर हत्याकांड आणि पन्नूच्या हत्येमध्ये भारतीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना उघडपणे नाराजी व्यक्त करता आली नसली तरी त्यांनी बायडेन प्रशासनाच्या विरोधात मतदान करण्याचे ठरवले. तर ट्रम्प हे भारताशी चांगले संबंध असल्याबद्दल वारंवार बोलत होते. पण दुसरीकडे भारतीय वंशाच्या असूनही, कमला हॅरिस भारतीयांशी तसा संबंध निर्माण करू शकल्या नाहीत.