Pune : ‘ही विधानसभा निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राहू नका. १९९९ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार २७० विरुद्ध २६९ असे एका खासदारामुळे पडले होते. आपल्याला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले आहे. करोना काळात शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी बनसोडे यांनी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी सव्वा कोटींचा निधी दिला आहे. बनसोडे हे सामाजिक भान जपणारे नेते आहेत, म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी जनतेला केले आहे.
काळभोरनगर, आकुर्डी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी अनेक कार्यकर्ते तसेच नेते देखील उपस्थित होते.
या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, अण्णा बनसोडे हे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. त्यांचा संपर्क चांगला आहे. बनसोडे आणि महायुती यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम योगेश बहल, सदाशिव खाडे हे करतील. पुढील काळात विरोधक चुकीच्या गोष्टी पसरवतील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन देखील पवार यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे उद्योग नगरीसह या शहराची मिनी भारत म्हणून ओळख झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरावर माझे प्रेम आहे. लक्ष्मण जगताप तसेच महेश लांडगे हे देखील माझेच कार्यकर्ते आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री पवार यांनी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. या निवडणुकीतील माघार घेतलेल्या उमेदवारांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
विरोधकांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून पंचसूत्रीच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या आहेत. महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. आम्ही दीड हजार रुपये देत असताना राज्याची तिजोरी खाली झाल्याचा आरोप करण्यात आला. मग आता हे तीन हजार रुपये कुठून आणणार हा प्रश्न आहे. आम्ही अशा योजना राबविताना आर्थिक नियोजन केले आहे. राज्यातील ग्राहकांना एक युनिट वीज पुरविण्यासाठी सात रुपये खर्च येतो. मात्र सोलर द्वारे निर्मित झालेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी साडेतीन रुपये खर्च येतो. शिल्लक राहिलेले पैसे शेतकऱ्यांसाठी देणार त्याचे आर्थिक नियोजन केले आहे. विरोधक लोकांना फसविण्याचे काम करत आहेत. हा त्यांचा चुनावी जुमला आहे असे पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अशापरिस्थितीत प्रचारासाठी खूप कमी काळ शिल्लक असून, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या सर्वच नेते प्रचार सभेत व्यस्त आहेत. अशातच महायुतीकडून राज्यात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे.