Sanjiv Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना (Sanjiv Khanna) यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या समारंभात संजीव खन्ना यांना पदाची शपथ दिली आहे. काल (रविवारी 10 नोव्हेंबर) माजी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी आज संजीव खन्ना यांनी शपथ घेतली आहे.
संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड हे वयाच्या 65 व्या वर्षी या पदावरून निवृत्त झाले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी न्यायमूर्ती चंद्रचूड तिसऱ्या पिढीतील वकील होते. त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
न्यायमूर्ती खन्ना यांचे ऐतिहासिक निर्णय
न्यायमूर्ती खन्ना, जानेवारी 2019 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ईव्हीएमचे पावित्र्य राखणे, निवडणूक रोखे योजना रद्द करणे, कलम 370 रद्द करणे आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करणे. यांसारख्या अनेक ऐतिहासिक निर्णयांचा एक भाग राहिले आहेत.
न्यायमूर्ती संजीव खन्ना कधी निवृत्त होणार?
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठता नियमानुसार, न्यायमूर्ती संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 या 6 महिन्यांसाठी भारताचे 51 वे मुख्य न्यायाधीश म्हणून देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करतील. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ फक्त सहा महिन्यांचा असून, ते सहा महिन्यात निवृत्त होणार आहेत.
चार दशकांहून अधिक काळ न्यायालयीन कारकीर्द
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची चार दशकांहून अधिक काळ न्यायालयीन कारकीर्द आहे. 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये सामील झाल्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांनी दिल्लीच्या तीस हजारी जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यांनी आयकर विभागाचे वरिष्ठ स्थायी वकील आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे स्थायी वकील म्हणून काम केले आहे.
2005 मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात पदोन्नती झाली आणि 2006 मध्ये ते कायम न्यायाधीश झाले. यानंतर, ते कोणत्याही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम न करता जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.