Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) जाहीरनामा रविवारी (10 नोव्हेंबर) जाहीर केला आहे.
’20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा ‘संकल्प पत्र’ जाहीरनामा राज्यातील जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंबित करतो, असे अमित शहा यांनी मुंबईत जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर सांगितले आहे.
मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेला हा जाहीरनामा राज्याच्या मतदारांसमोर काल मांडण्यात आला आहे.
HM Shri @AmitShah releases BJP's Sankalp Patra for Maharashtra Assembly Election in Mumbai. #BJPSankalp4Maharashtra https://t.co/iBncZP2Mlf
— BJP (@BJP4India) November 10, 2024
महाराष्ट्र निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :-
भाजपने जाहीर केलेल्या ‘संकल्प पत्रात’ पुढील पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. असे म्हंटले आहे. पश्चिमेकडील नद्यांमध्ये वाहणाऱ्या 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यातून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पुनर्निर्देशित केले जाईल. असेही सांगण्यात आले आहे.
तसेच पश्चिम विदर्भातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी वैनगंगा नदीतील पाण्याचा वापर केला जाणार असल्याचं देखील संकल्प पत्रात आहे. पावसाळ्यात कृष्णा, कोयना आणि इतर नद्यांमधून वाहणारे अतिरिक्त पाणी पश्चिम महाराष्ट्रातील बारमाही दुष्काळी भागात पुनर्निर्देशित केले जाणार आहे.
महिलांना सक्षम बनवण्यासाठी एक कोटी कुटुंबांना महिला बचत गटांशी जोडले जाणार आहे आणि त्यांना विशेष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्याला सीलबंद पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 11 धरणे जोडली जाणार आहेत.
येत्या पाच वर्षांत, सौरऊर्जेचा वापर शेतीच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे, यामुळे शेतकऱ्यांना दिवसभरात 12 तास वीज मिळेल. त्यासाठी सौरऊर्जेला कृषी सिंचन सुविधेशी जोडण्यासाठी ‘सोलर पॉवर ग्रिड’ उभारण्यात येणार आहे.
तसेच पुढील पाच वर्षात एक कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे नियोजन आहे.
केंद्र सरकारच्या मदतीने पायाभूत सुविधांमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार असून, आर्थिक अडचणींमुळे कोणीही वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये, याची काळजी घेऊन पंतप्रधान आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार केला जाणार आहे.
सर्व माजी सैनिक, शहीदांचे कुटुंब आणि कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
तससह लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १५०० वरुन २१०० देण्यात येणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.