Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, राज्यात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक सभा पार पडली आहे. जिथे त्यांनी लोकसभेत झालेल्या पराभवाबद्दल पुन्हा एक खंत व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा बारामतीत मोठा पराभव झाला होता. बारातमतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली होती ज्यात सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला. त्यांच्या या पराभवाची सल आजही अजित पवार यांच्या मनात असल्याचे दिसत आहे. आजच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील ही सल बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार यांनी आज बोलून दाखवली आहे. ते सोमेश्वरनगर येथे बोलत होते.
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, या पॅटर्नची आठवण करून देत अजित पवार म्हणाले, लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला आणि मी तो स्वीकारला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी हक्काने तुमच्याकडे मते मागण्यासाठी आलो आहे. यावेळी मला खूश करण्यासाठी विधानसभेला मला मतदान करा, अस अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी विधाने बारामतीतील जनतेकडून करण्यात आली होती. अशा परिस्थितीत विधानसभेत जनता अजितदादांना साथ देणार का हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे उभे आहेत. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच काका विरूद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. त्यामुळे बारामतीतील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.