Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सध्या राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, विविध पक्षांकडून बंडखोरांवर कारवाई सुरु आहे.
काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळत आहे. काँग्रेसने नुकतीच १६ बंडखोर उमेदवारांवर कारवाई करत पक्षातून सहा वर्षाची बंदी घातली आहे. त्यानंतर आता काँग्रेसने आणखी 7 बंडखोर उमेदवारांना पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित केले आहे. विविध विधानसभा मतदारसंघातून (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) हे उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
काँग्रेसने ही कारवाई शामकांत सनेर, राजेंद्र ठाकूर, आबा बागुल, मनीष आनंद, सुरेश कुमार जेथलिया, कल्याण बोराडे आणि चंद्रपॉल चौकसे यांच्या विरुद्ध केली आहे. काँग्रेसने बंडखोर उमेदवारांना आधीच इशारा दिला होता.
काँग्रेस पक्षाने उमेदवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरी बंडखोरांनी माघार घेतली नाही. अखेर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. करवाई करण्याआधी काँग्रेसने या बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, यापूर्वी भाजपने देखील 40 बंडखोर उमेदवारांवर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाने देखील बंडखोरीविरोधात कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रास्ता दाखवला आहे.