Israel-hezbollah War : इस्राईली (Israel) सैन्याने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर सलीम जमील अय्याश याला ठार केले आहे. इस्राईलच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहच्या उल-कुसेर भागात सलीम लपला होता. इस्त्राईलला याची माहिती मिळताच इस्त्राईलने सीरियावर हल्ला करून त्याचा खात्मा केला आहे. इस्त्राईली लष्कराच्या हल्ल्यात सलीम व्यतिरिक्त आणखी 8 जण मारले गेले आहेत.
10 मिलियन डॉलरचे बक्षीस
सलीम हा हिजबुल्लाहच्या युनिट 151 चा सदस्य होता. अमेरिकेने त्याच्यावर 10 मिलियन डॉलर (84 कोटी रुपये) बक्षीस ठेवले होते. लेबनॉनचे पंतप्रधान रफिक हरीरी यांच्या हत्येला तो जबाबदार होता. हरीरी हे लेबनॉनचे सर्वात लोकप्रिय सुन्नी मुस्लिम नेते होते. ते 5 वेळा देशाचे पंतप्रधान होते.
14 फेब्रुवारी 2005 रोजी हरीरी यांच्या ताफ्याला बेरूतमध्ये 3,000 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले 21 लोकही मारले गेले होते.
2022 मध्ये न्यायाधिकरणाने सलीम आणि त्याच्या साथीदारांना हरीरी यांच्या हत्येसाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, हिजबुल्लाहच्या नेत्यांनी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यास नकार दिला होता. त्यानंतर सलीमला सुरक्षित ठेवण्यासाठी हिजबुल्लाहने विशेष काळजी घेतली होती, पण इस्त्राईली गुप्तचर संस्था मोसादने त्याचा ठावठिकाणा शोधून हवाई हल्ल्याच्या माध्यमातून त्याची हत्या केली आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर हल्ल्याची जबाबदारी आता इस्त्राईलने घेतली आहे. इस्त्राईने 17 सप्टेंबर रोजी लेबनॉनमधील हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजरमध्ये झालेल्या स्फोटांची जबाबदारी तब्बल 54 दिवसांनी इस्त्रायने स्वीकारली आहे.