Mithun Chakraborty : प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी आली आहेत. पाकिस्तानच्या शहजादा भट्टी नावाच्या गँगस्टरने एक व्हिडिओ शेअर करत मिथुन चक्रवर्ती यांना धमकी दिली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांना ठार मारण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये मिथुन यांना माफी मागण्यासाठी 10-15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अन्यथा त्यांच्या जीवाला धोका असल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
काय म्हणाले होते मिथुन चक्रवर्ती?
गेल्या महिन्यात मिथुन चक्रवर्ती यांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात भडकाऊ भाषण केले होते. यानंतर मिथुन यांच्या विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला होता. या भाषणाबाबत मिथुन म्हणाले की, ‘आज मी अभिनेता म्हणून नाही तर ६० च्या दशकातील मिथुन चक्रवर्ती म्हणून बोलत आहे. मी रक्ताचे राजकारण केल्यामुळे राजकारणातील डावपेच माझ्यासाठी नवीन नाहीत. मी काहीही केले तर काय होऊ शकते हे मला माहीत आहे. यासाठी जे काही लागेल ते मी करेन, असे मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही सांगितले आहे. इथे एका नेत्याने सांगितले होते की, हिंदूंची कत्तल करून भागीरथीत बुडवले जाईल, पण मला वाटले की मुख्यमंत्री काहीतरी बोलतील, पण काही झाले नाही आणि आता मी म्हणतोय की मी तुम्हाला तुमच्या भूमीत जमीनदोस्त करून टाकेन.’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.
मिथुन यांच्या या वक्तव्यानंतर कोलकात्याच्या अनेक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. गेल्या मंगळवारी काही स्थानिक लोकांनी मिथुन यांच्या विरोधात जोरसांको आणि बोबझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याशिवाय बिधाननगर दक्षिण पोलिस ठाण्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व तक्रारींमध्ये आता त्यांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
याआधीही गेल्या दोन महिन्यात अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमक्यांमागे कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या धमकीवर मिथुन चक्रवर्ती यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.