Pune : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींची आजची सभा पुण्याच्या टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या या सभेमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
या सभेमुळे नागरिकांची आणि वाहनचालकांना गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने काही रस्ते बंद करून पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी बंद
सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधानची सुरक्षा आणि वाहतूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हा रस्ता बंद असणार आहे.
अशास्थितीत वाहनचालकांनी ना.सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी :-
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त आज काही रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असणार आहे. ते पुढीलप्रमाणे :- टिळक चौक ते भिडे पूल , गरुड गणपती चौक ते भिडे पूल चौक, भिडे पूल ते केळकर रोड, एनएस फडके चौक ते नाथ पै चौक, अंबिल ओढा जंक्शनमार्गे बाबुरा घुले रोड. या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी असणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होऊ शकते. अशास्थितीत सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी मार्गांचा वापर करणे महत्वाचे ठरणार आहे. पुण्यातील प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस विभागाने योग्य त्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी सूचनांचे पालन करून योग्य ती खबरदारी घ्यावी.