Narendra Modi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदी सध्या महाराष्ट्र्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी आज महाराष्ट्रातील चिमूर येथील सभेला संबोधित केले आहे. या सभेत बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.
सभेत पंतप्रधान म्हणाले, ‘तुमच्यातील एकजूट तोडण्यासाठी काँग्रेस डाव खेळत आहे. आदिवासी समाज जातींमध्ये विभागला गेला तर त्यांची ओळख आणि ताकद नष्ट होईल. राहुल गांधींनी स्वतः परदेशात जाऊन याची घोषणा केली आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की, ‘काँग्रेसच्या या कारस्थानाला बळी पडू नका. आपण एकजूट राहिले पाहिजे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, एकजूट राहिलो तरच आपण सुरक्षित राहू.’
जर तुम्ही एकजुटीने राहिला नाहीत तर काँग्रेस सर्वात आधी तुमचे आरक्षण काढून घेईल, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हंटले आहे. पुढे पंतप्रधान म्हणाले, ‘या देशावर राज्य करण्यासाठीच आपला जन्म झाला, अशी मानसिकता काँग्रेसच्या राजघराण्यात कायम आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने दलित, मागासवर्गीय, आदिवासींना पुढे जाऊ दिले नाही.’
यापूर्वी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बंटोगे तो कटोगे’ असा नवा नारा दिला आहे. महाराष्ट्रातील वाशिम येथे निवडणूक प्रचारादरम्यान आदित्यनाथ म्हणाले होते की, ‘जर आपण एकत्र आलो तरच आपण सुरक्षित आहोत.’ यावेळी त्यांनी एकत्र राहण्याचे आवाहन करत जर आपण एकत्र राहिलो तरच सुरक्षित राहू आणि जर विभागलो तर कापले जाऊ. असे म्हंटले होते.
दरम्यान, पंतप्रधानांनी आजच्या सभेत जम्मू काश्मीर मधील कलम 370 वर देखील भाष्य केले आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, ‘आम्ही कलम 370 रद्द केले. काश्मीर भारत आणि भारतीय राज्यघटनेशी पूर्णपणे जोडलेले आहे. पण काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष काश्मीरमध्ये पुन्हा ३७० लादण्याचा ठराव करत आहेत. हे लोक पाकिस्तानला हवे ते काम करत आहेत.
पंतप्रधान पुढे म्हणाले, आमचे जम्मू-काश्मीर अनेक दशकांपासून फुटीरतावाद आणि दहशतवादाने जळत आहे. जम्मू-काश्मीरच्या मातीवर मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्राचे अनेक शूर जवान शहीद झाले आहेत. ज्या कायद्यानुसार हे सर्व घडले ते कलम ३७० होते. हे कलम ३७० ही काँग्रेसची देणगी होती. असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर पुन्हा एकदा टीका केली आहे.