भारतीय निवडणूक आयोगाकडून आलेल्या माहिती नुसार झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 13.04 टक्के मतदानाची नोंद झाली आहे .झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून राज्यातील 81 जागांपैकी 43 जागांवर मतदान आज पार पडत आहे.
इलेक्शन कमिशन कडून आलेल्या अधिकृत माहितीनुसार झारखंड मध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत, सिमडेगा जिल्हा 15.09 टक्के मतदानासह आघाडीवर आहे, त्यानंतर लोहरदगा आणि कोडरमा 14.97 टक्के मतदानाने आघाडीवर आहे.
सेराईकेल्ला-खरसावनसाठी 14.62 टक्के, रामगड आणि खुंटीमध्ये 14.37 टक्के, गुमलामध्ये 13.93 टक्के, पश्चिम सिंगबुम आणि लातेहारमध्ये 13.80 टक्के, गढवामध्ये 13.41 टक्के, हजारीबागमध्ये 13.20 टक्के मतदान झाले आहे. तर राज्याची राजधानी रांची येथे 12.06 टक्के मतदान झाले, तर पलामू जिल्ह्यात 11.84 टक्के मतदान झाले आहे. तर पूर्व सिंहभूम जिल्ह्यात सर्वात कमी 11.25 टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोडरमा येथील मतदान केंद्रावर मतदान केले आणि प्रत्येकाने मतदान करून “लोकशाहीच्या महान उत्सवात” सहभागी होण्याचे आवाहन केले आहे .
“आज लोकशाहीचा महान सण आहे. झारखंडमध्ये 43 जागांसाठी मतदान होत आहे. आम्ही सर्वांना विनंती करू आणि आवाहन करू की लोकशाहीच्या या महान उत्सवात उत्साहाने सहभागी व्हा आणि मतदान करा…” असे त्या म्हणाल्या आहेत.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनीही रांचीमधून मतदान केले आणि ते म्हणाले, ” मतदान हे लोकशाहीचे बलस्थान आहे. निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रतिनिधी निवडतो जे पुढे समाज आणि देशाच्या कल्याणासाठी काम करतात”.
झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनीही राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आपले मत नोंदवले आणि राज्यातील जनतेला “सूज्ञपणाने” मतदान करण्याचे आणि मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केले.
झारखंडमधील 15 जिल्ह्यांतील 43 मतदारसंघातील मतदार आज आपले मत नोंदवणार आहेत . या निकालावर ७३ महिलांसह ६८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.उर्वरित 38 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.
झारखंडच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये सरायकेलामध्ये माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (भाजप) आणि जमशेदपूर पूर्वमध्ये अजॉय कुमार (काँग्रेस) यांचा समावेश आहे, जिथे त्यांचा सामना माजी मुख्यमंत्री रघुबर यांच्या सून पूर्णिमा दास साहू यांच्याशी असणार आहे. जगनाथपूरमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा या काँग्रेस नेते सोना राम सिंकू यांच्याविरोधात लढत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) रांचीमधून विद्यमान राज्यसभा खासदार महुआ माझी यांना उमेदवारी दिली आहे.