धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद देशाच्या राज्यघटनेत नसल्याने आम्ही मुस्लीम किंवा अल्पसंख्यांकांना आरक्षण मिळू देणार नाही. तसेच आमचा कार्यकाळ संपायच्या आत मुंबईतील एक-एक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भाजप वेचून बाहेर काढेल, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे .
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50 टक्क्यांची मर्यादा संपलेली आहे. मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल तर दलित, ओबीसी, आदिवासी यांचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना द्यायचे का? त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण देणे शक्य होणार नाही.
कलम 370च्या मुद्द्यावरुन देखील शाहांनी काँग्रेसला लक्ष्य केले. कलम 370 हटवण्यासाठी कॉंग्रेसने विरोध केला होता. 370 कलम हटवले, तर रक्ताच्या नद्या वाहतील, असे ते म्हणत होते. मात्र असे काहीच झाले नाही. जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद 370 परत लागू करु शकणार नाही. राहुल गांधी यांच्या चार पिढ्या आल्या तरी आम्ही ही गोष्ट शक्य होऊ देणार नाही, असे शाह यांनी स्पष्ट केले. सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते की, मी गृहमंत्री असताना मला काश्मीरमध्ये जायला भीती वाटायची. काही हरकत नाही, मात्र आता मी त्यांना सांगू इच्छितो की आता तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन जा, तुमच्या केसाला देखील कोणी धक्का लावणार नाही. कारण पंतप्रधान मोदींनी देशातून आतंकवाद मुळासकट नष्ट केला आहे.
भाजपने देशाच्या संस्कृतीचे कायम रक्षण केले. अयोध्येत भव्य राममंदिर उभारले. काशी विश्वनाथ कॉरिडोअरचे काम झाले आणि सोमनाथ मंदिराला सोन्याचा मुलामा देण्याचे काम सुरु आहे. बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आलेल्या लाखो हिंदूंना भारतीय नागरिकत्त्व देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे निर्णय चुकीचे होते का, असा प्रश्नही अमित शाह यांनी काँग्रेसला विचारला आहे .
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, तुम्हाला नागपूरला जाताना विमानात बसायला भीती वाटत असेल, तर आम्ही तयार केलेल्या समृद्धी महामार्गाने जा, लवकर पोहोचाल. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केली, मी विचारतो उद्धव ठाकरे तुम्ही अजून किती लाचार होणार? कधी एकांतात बसून बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण करा.
कर्नाटकमध्ये वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात असे होणार नाही. पंतप्रधान मोदींनी यात सुधारणा केली आहे. वक्फ बोर्डमध्ये बदल होणार आहे. असे सांगत शरद पवारांवर टीका करताना ते म्हणाले की , पवार 10 वर्षे ते कॅबिनेट मंत्री होते, मग त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का नाही मिळवून दिला? काही हरकत नाही, आता पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मिळवून दिला आहे.