अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करत आहेत. आपल्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांच्या नियुक्तीनंतर आता ट्रम्प यांनी हिंदू नेत्या तुलसी गबार्ड यांच्याकडे राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी दिली आहे. बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये माजी अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर तुलसी या पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्या एव्हरिल हेन्स यांची जागा घेतील. तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार आहेत. गबार्ड यांनी वयाच्या 21 व्या वर्षी हवाईमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली. तसेच त्या 4 वेळा डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार होत्या.
तुलसी या आधी बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. तुलसी गबार्ड या अमेरिकन काँग्रेसच्या पहिल्या हिंदू महिला सदस्या आहेत.
तुलसी गबार्ड यांचा जन्म अमेरिकेत झाला असून त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भगवतगीतेवर हात ठेवून घेतलेल्या शपथेची बरीच चर्चा झाली होती.जन्मापासून शाकाहारी असलेल्या तुलसी गबार्ड यांनी रंगमंचावरून अनेकवेळा रामाचे भजन गायले आहे.
तुलसी यांची ही नियुक्ती भारताच्या विशेषतः, हिंदूंच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा त्यांनी अनेकदा निषेध केला आहे. याआधी तुलसी गबार्ड यांनी दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी लष्करी मदत कमी करण्याचाही त्यांनी काँग्रेसमध्ये प्रयत्न केला होता. तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचे समर्थन केले होते.वेळप्रसंगी अमेरिकन प्रशासनाला याबाबत फटकारलेही होते.
अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील हिंदूंच्या रक्षणाबाबत आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आता तुलसी गबार्ड यांची त्यांनी केलेली नियुक्ती अमेरिकेत असणाऱ्या हिंदूंसाठी हितकारक ठरेल अशी आशा बाळगली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं भारतासाठी कितपत उपयुक्त ठरतील याविषयी मतमतांतरं आहेत. मात्र अमेरिकेतील हिंदूंबाबत ट्रम्प यांची धोरणं तिथल्या भारतीयांसाठी अनुकूल आहेत. त्यामुळे अमेरिकी हिंदू नागरिकांनी निवडणुकीत ट्रम्प यांना विश्वासाने दिलेला कौल योग्य ठरत आहे हे नक्की.